Wednesday 4 April 2018

आई........
आई, हे दोन शब्द.... प्रत्येकाच्या आयुष्यात यांना विशेष स्थान आहे यात शंकाच नाही. हे शब्द म्हणजे मानवी अस्तित्वाची जाणीव करुन देणारे शब्द. मी नचिकेत आश्रम शाळेत मुलांना "एक तासाची आई" या माझ्या उपक्रमांतर्गत रोज शिकवायला जात असे. या आश्रमातील प्रत्येकाची एक कथा होती ... व्यथा होती.  गणेश, वय वर्ष अंदाजे सहा किंवा सात,  खुप रागीट आणि खोडकर मुलग म्हणुन त्याची  ख्याती होती. त्याच्या बद्दल मला आश्रमातून जी माहिती मिळली होती त्याप्रमाणे वडिल गेल्यावर त्याच्या आईने त्याला या आश्रमात आणून सोडले होते. आणि नंतर ती त्याच्या आयुष्यात परत कधीच आली नव्हती. गणेश फार मुलांमध्ये मिसळत नसे. मी या अलूफ गणेशशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण तो नेहमीच कुठले ना कुठले निमित्त शोधून निघून जायचा.  खोडकर गणेश कधी कधी आपल्याच विचारात हरवून जायचा आणि मग तास न तास पायरीवर बसून आकाशाकडे डोळे लावून बघत बसायचा. अनेक दिवस प्रयत्न केल्यावर गणेश माझ्याशी बोलु लागला. हळु हळु तो मला उलगडु लागला. पण त्याच्या मनात काय चाललयं हे कळायला मला खुप दिवस लागलेत. एक दिवस आश्रमात कार्यक्रम  होता. नेहमीप्रमाणे गणेशने तो  टाळला आणि गच्चीच्या पायरीवर जाऊन बसला. मी ही थोढ्यावेळाने त्याच्या जवळ गेले. तर तो आकाशाकडे रडवेल्या डोळ्याने बघत होता.
काय शोधतोय? मी विचारले
माझा बाप? गणेश उत्तरला.
(या उत्तराने मी जरा दचकलेच.)
कशाला शोधतोय? मी
"तो आज असता तर आई मला असं सोडून गेली नसती." गणेश
त्याची आई का सोडून गेली. तिची काय व्यथा आहे, काय वेदना आहेत हे समजून घेण्याचे त्याचे वय नक्कीच नव्हते. त्याच्यासाठी त्या क्षणी "ती मला सोडुन गेली" हेच सत्य होते आणि त्याचे आकलन त्याला होत नव्हते. या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ त्याला  देणे, जगण्यासाठी आणि त्या चिमुकल्या  पंखात झेप घेण्याची त्याची इछ्चाशक्ती जागृत ठेवणे गरजेचे होते.  अस्तिवात नसलेला बाप आणि अस्तित्वात असलेली आई यात आपलं अस्तित्व शोधणारा गणेश आजही आठवला की अंगावर शहारे येतात. कालांतराने सुपदेशन आणि आश्रमातील व्यवस्थापकांच्या मदतीने  गणेश हा परिस्थितीला सामोरे जाण्यात यशस्वी झाला असला तरी एक खंत त्याच्या मनाच्या खोल कप्प्यात आजही दडलेली आहे. समाधान एवढेच आहे की जीवनातील चांगले - वाईट त्याला कळतय आणि तो चांगल्या गोष्टी आत्मसात करतोय. असे अनेक गणेश अवतीभवती वावरतांना दिसताहेत. त्यांना गरज आहे एका आधाराची... मदतीच्या एका हाताची.

विनीता श्रीकांत देशपांडे

No comments:

Post a Comment