Tuesday 17 April 2018

सोपान ..एक कथा मनाच्या तळ्यातली....


सोपान, एक रेखीव, सावळा आणि चुणचुणीत मुलगा.
आई वडिल एका अपघातात गेले आणि तो
अनाथ झाला. एके दिवशी नातेवाईकांच्या मदतीने याची
रवानगी अनाथआश्रमात झाली.
काळानी घातलेला हा आघात सहन करत सोपान 
जीवनाच्या रहाटगाड्यात इतर मुलासोंबत रोजचं आयुष्य जगत होता.
लहान वयातच त्याच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या होत्या.
चांगल-वाईट, गरज भागवण्यासाठी करावी लागणारी तडजोड
कमी वयातच कळायला लागली.
त्यात त्याची जिद्द, ती मात्र कमालीची हं. शाळेत पहिल्या पाच
नंबरातील जागा कधीच सोडली नाही.
स्कॉलरशीपवर शिक्षण सुरु होते, सकाळी पेपर टाकयला जायचा,
आश्रमाच्या समोरील दुकानात जाधव काकांना मदत करायला जायचा.
काय मग? मोठ्ठ झाल्यावर काय होणार? या प्रश्नाचं उत्तर नेहमीच टाळणारा 
सोपान, आज त्याला त्यच्या वेगेनार मधून उतरतांना बघितलं आणि खरच खुप खुप आनंद झाला.
वकिलीचं शिक्षण आपल्या हिम्मतीवर करुन एका मल्टीनॅशनल कंपनीत सल्लागार म्हणुन काम करत होता.
खर तर वकिल का व्हायचं हे अनेकदा विचारल्यावर त्याने कधीच उत्तर दिले नव्हते.
आज मात्र गाडीच्या पेढ्यांसोबत त्याने माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर दिले.
आई-बाबांचा अपघात झाला तेव्हा तो सातवीत होता. ज्या गाडीने त्यांना भर रस्त्यात उडवले, नुकसान भरपाईचा दावा त्यांवर केला असला तरी चुलत्यांनी त्यात हेराफेरी करुन सोपानपर्यंत फार थोडी रक्कम पोहचली होती. त्यातही ती त्याला वेळेत मिळाली नाही. 
वकिल झाल्यापासून आता तो या आश्रमातील सर्व सरकारी कचेरीची काम स्वत: बघतो. 
खरच मी त्याला कित्येक वर्षांपासून पुस्तकी ‍ज्ञान देत होते, व्यवहार तर त्याला परिस्थितीने शिकवला होता. त्याच्या मनाच्या तळ्यात खोल रुतलेली ही गोष्ट मला आज कळली. आनंद याचा होता की त्याची जिद्द आणि हुशारी सत्कार्णी लागली होती.

विनीता श्रीकांत देशपांडे

No comments:

Post a Comment