Wednesday 18 April 2018

ओझं

आज माझी सखी, सावली
का ग तू अशी अडखळली?
संसाराचं ओझं माझ्या डोक्यावर ठेवून
आई-बाप फिरतात आहे,
शहरातील प्रत्येक कचराकुंडीत
त्यांच आणि कदाचित माझंही
प्राक्तन शोधत.
आणि हे ओझं, किती दिवस मुक्काम
यांचा? ते ही माहित नाही.
कोणी घेणार का हे ओझं?
ते ही माहित नाही.
आणि अग सावली, तू  तरी साथ
सोडू नकोस.
हे ओझं घेऊन दमल्यावर, रात्री
तुझ्या कुशीत शांत झोप लागते ग.
आणि मग स्वप्न,  स्वप्नात अंगभर कपडे
पोटभर जेवण,
आणि डोक्यावर ओझं नसलेली मी,
आकाशाकडे टक लावून बघते.
सखी सावली, नको ग अडखळू
हवं तर तुझं ओझं पण मी वाहते.

विनीता श्रीकांत देशपांडे

No comments:

Post a Comment