Friday 4 May 2018


प्राक्तन


माझं प्राक्तन?
मी नाही निवडलं हे असं आयुष्य?
मी हात पसरुन का जगतोय?
पण मग माझ्या हातावरच्या रेषा?
कोणी वाचून सांगेल का?
कोण माझे जन्मदाते?
रस्त्यावर का वणवण फिरतोय?
पोटाची खळगी भरायला असं
किती दिवस लाचारीने जगणार मी?
उत्तरं आहेत का यांची कोणाकडे?
कोपर्‍यावरच्या वडाच्या पारावर एक मंदिर आहे,
रोज येणारे जाणारे नमस्कार करतात, हा देव पावतो म्हणे.
मी पण रोज नमस्कार करतो, मला केव्हा पावणार?
वाट बघतोय.
मी काम करायला तयार आहे, पण.....
"बालकामगार" सध्या कोणी ठेवत नाही म्हणे.


विनीता श्रीकांत देशपांडे

Monday 23 April 2018

पाऊलं पाऊलं


आम्ही नवी पिढी
आमची वाटचाल नव्या दिशेकडे
नवे क्षितीज .... नवे आकाश.... नवे स्वप्न...
प्रत्येक घटनेचं राजकारण करणारे तुम्ही
नाही रुतायचयं आम्हाला तुमच्या राजकारणी डावपेचात
आम्ही स्वछंदी पाखरं ...
नाही इथे जात-पात अन कुठलाच भेदभाव
नाही अडकायचय आम्हाला तुमच्या मोहाच्या पिंजर्‍यात
नव्या नव्या आविष्कारांचे आकाश खुणावतय आम्हाला
आमचा इतिहास भूगोल संस्कृती ठाऊक आहे आम्हाला
आम्ही नाही देणार बळी कुणाच्या चुकीसाठी आमच्या पिढीचा
आम्ही नव्या देशाची नवी संकल्पना
आम्ही रचियते स्वच्छ-सुंदर-निर्मळ भारताचे
आम्ही भारतीय आणि
मानवता आमचा धर्म
नवे क्षितीज .... नवे आकाश .... नवे स्वप्न
या दिशेने चालले अगणित पाउल पाऊल.

विनीता श्रीकांत देशपांडे

Wednesday 18 April 2018

ओझं

आज माझी सखी, सावली
का ग तू अशी अडखळली?
संसाराचं ओझं माझ्या डोक्यावर ठेवून
आई-बाप फिरतात आहे,
शहरातील प्रत्येक कचराकुंडीत
त्यांच आणि कदाचित माझंही
प्राक्तन शोधत.
आणि हे ओझं, किती दिवस मुक्काम
यांचा? ते ही माहित नाही.
कोणी घेणार का हे ओझं?
ते ही माहित नाही.
आणि अग सावली, तू  तरी साथ
सोडू नकोस.
हे ओझं घेऊन दमल्यावर, रात्री
तुझ्या कुशीत शांत झोप लागते ग.
आणि मग स्वप्न,  स्वप्नात अंगभर कपडे
पोटभर जेवण,
आणि डोक्यावर ओझं नसलेली मी,
आकाशाकडे टक लावून बघते.
सखी सावली, नको ग अडखळू
हवं तर तुझं ओझं पण मी वाहते.

विनीता श्रीकांत देशपांडे

Tuesday 17 April 2018

सोपान ..एक कथा मनाच्या तळ्यातली....


सोपान, एक रेखीव, सावळा आणि चुणचुणीत मुलगा.
आई वडिल एका अपघातात गेले आणि तो
अनाथ झाला. एके दिवशी नातेवाईकांच्या मदतीने याची
रवानगी अनाथआश्रमात झाली.
काळानी घातलेला हा आघात सहन करत सोपान 
जीवनाच्या रहाटगाड्यात इतर मुलासोंबत रोजचं आयुष्य जगत होता.
लहान वयातच त्याच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या होत्या.
चांगल-वाईट, गरज भागवण्यासाठी करावी लागणारी तडजोड
कमी वयातच कळायला लागली.
त्यात त्याची जिद्द, ती मात्र कमालीची हं. शाळेत पहिल्या पाच
नंबरातील जागा कधीच सोडली नाही.
स्कॉलरशीपवर शिक्षण सुरु होते, सकाळी पेपर टाकयला जायचा,
आश्रमाच्या समोरील दुकानात जाधव काकांना मदत करायला जायचा.
काय मग? मोठ्ठ झाल्यावर काय होणार? या प्रश्नाचं उत्तर नेहमीच टाळणारा 
सोपान, आज त्याला त्यच्या वेगेनार मधून उतरतांना बघितलं आणि खरच खुप खुप आनंद झाला.
वकिलीचं शिक्षण आपल्या हिम्मतीवर करुन एका मल्टीनॅशनल कंपनीत सल्लागार म्हणुन काम करत होता.
खर तर वकिल का व्हायचं हे अनेकदा विचारल्यावर त्याने कधीच उत्तर दिले नव्हते.
आज मात्र गाडीच्या पेढ्यांसोबत त्याने माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर दिले.
आई-बाबांचा अपघात झाला तेव्हा तो सातवीत होता. ज्या गाडीने त्यांना भर रस्त्यात उडवले, नुकसान भरपाईचा दावा त्यांवर केला असला तरी चुलत्यांनी त्यात हेराफेरी करुन सोपानपर्यंत फार थोडी रक्कम पोहचली होती. त्यातही ती त्याला वेळेत मिळाली नाही. 
वकिल झाल्यापासून आता तो या आश्रमातील सर्व सरकारी कचेरीची काम स्वत: बघतो. 
खरच मी त्याला कित्येक वर्षांपासून पुस्तकी ‍ज्ञान देत होते, व्यवहार तर त्याला परिस्थितीने शिकवला होता. त्याच्या मनाच्या तळ्यात खोल रुतलेली ही गोष्ट मला आज कळली. आनंद याचा होता की त्याची जिद्द आणि हुशारी सत्कार्णी लागली होती.

विनीता श्रीकांत देशपांडे

Wednesday 4 April 2018




प्रश्न.............
जन्माला घातले आणि सोडून गेले
माझा काय गुन्हा?हे तरी सांगा.
अवती भवती बघून जगायला शिकलो,
चांगले वाईट मी ठरवू कसं?हे तरी सांगा.
आई बाबा, शाळा दप्तर हवंय मला
चार चौघांसारखं जगु कसं?हे तरी सांगा.
जात पात धर्म काही माहित नाही मला
पोटाची खळगी भरु कशी?हे तरी सांगा.
मोठ्ठं होऊन ऑफिसमध्ये जायचं आहे,
कसं होणार मला शक्य? हे तरी सांगा.

विनीता श्रीकांत देशपांडे

आई........
आई, हे दोन शब्द.... प्रत्येकाच्या आयुष्यात यांना विशेष स्थान आहे यात शंकाच नाही. हे शब्द म्हणजे मानवी अस्तित्वाची जाणीव करुन देणारे शब्द. मी नचिकेत आश्रम शाळेत मुलांना "एक तासाची आई" या माझ्या उपक्रमांतर्गत रोज शिकवायला जात असे. या आश्रमातील प्रत्येकाची एक कथा होती ... व्यथा होती.  गणेश, वय वर्ष अंदाजे सहा किंवा सात,  खुप रागीट आणि खोडकर मुलग म्हणुन त्याची  ख्याती होती. त्याच्या बद्दल मला आश्रमातून जी माहिती मिळली होती त्याप्रमाणे वडिल गेल्यावर त्याच्या आईने त्याला या आश्रमात आणून सोडले होते. आणि नंतर ती त्याच्या आयुष्यात परत कधीच आली नव्हती. गणेश फार मुलांमध्ये मिसळत नसे. मी या अलूफ गणेशशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण तो नेहमीच कुठले ना कुठले निमित्त शोधून निघून जायचा.  खोडकर गणेश कधी कधी आपल्याच विचारात हरवून जायचा आणि मग तास न तास पायरीवर बसून आकाशाकडे डोळे लावून बघत बसायचा. अनेक दिवस प्रयत्न केल्यावर गणेश माझ्याशी बोलु लागला. हळु हळु तो मला उलगडु लागला. पण त्याच्या मनात काय चाललयं हे कळायला मला खुप दिवस लागलेत. एक दिवस आश्रमात कार्यक्रम  होता. नेहमीप्रमाणे गणेशने तो  टाळला आणि गच्चीच्या पायरीवर जाऊन बसला. मी ही थोढ्यावेळाने त्याच्या जवळ गेले. तर तो आकाशाकडे रडवेल्या डोळ्याने बघत होता.
काय शोधतोय? मी विचारले
माझा बाप? गणेश उत्तरला.
(या उत्तराने मी जरा दचकलेच.)
कशाला शोधतोय? मी
"तो आज असता तर आई मला असं सोडून गेली नसती." गणेश
त्याची आई का सोडून गेली. तिची काय व्यथा आहे, काय वेदना आहेत हे समजून घेण्याचे त्याचे वय नक्कीच नव्हते. त्याच्यासाठी त्या क्षणी "ती मला सोडुन गेली" हेच सत्य होते आणि त्याचे आकलन त्याला होत नव्हते. या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ त्याला  देणे, जगण्यासाठी आणि त्या चिमुकल्या  पंखात झेप घेण्याची त्याची इछ्चाशक्ती जागृत ठेवणे गरजेचे होते.  अस्तिवात नसलेला बाप आणि अस्तित्वात असलेली आई यात आपलं अस्तित्व शोधणारा गणेश आजही आठवला की अंगावर शहारे येतात. कालांतराने सुपदेशन आणि आश्रमातील व्यवस्थापकांच्या मदतीने  गणेश हा परिस्थितीला सामोरे जाण्यात यशस्वी झाला असला तरी एक खंत त्याच्या मनाच्या खोल कप्प्यात आजही दडलेली आहे. समाधान एवढेच आहे की जीवनातील चांगले - वाईट त्याला कळतय आणि तो चांगल्या गोष्टी आत्मसात करतोय. असे अनेक गणेश अवतीभवती वावरतांना दिसताहेत. त्यांना गरज आहे एका आधाराची... मदतीच्या एका हाताची.

विनीता श्रीकांत देशपांडे